श्री.संत सावता माळी चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

श्री.संत सावता माळी चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

बिंदुसरा नदीपात्रासह स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाला नगरपरिषद प्रशासनाची मूक संमती 
बीड : (दि. २२) बीड शहरातील मोंढा रोड परिसरातील श्री. संत सावता माळी महाराज चौकातील बिंदुसरा नदीपात्रालगत असलेली हिंदू स्मशानभूमी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, वाढत्या अतिक्रमणामुळे स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिंदुसरा नदीपात्रासह स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

स्मशानभूमी ही केवळ जागा नसून शेवटच्या निरोपाची साक्षीदार

स्मशानभूमी ही केवळ जमीन नसून प्रत्येक कुटुंबाच्या शेवटच्या निरोपाची साक्षीदार असते. त्यामुळे तिचे संरक्षण ही शहराची सामूहिक जबाबदारी आहे. स्मशानभूमीच्या जागेची अधिकृत कागदपत्रे, हद्द व प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासून अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार तत्काळ कारवाई करावी. तसेच स्मशानभूमीचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 २००५-०६ मध्ये बांधण्यात आले स्मशानभूमीचे बांधकाम

बीड शहरातील मोंढा रोडलगत बिंदुसरा नदीपात्राशेजारी श्री. संत सावता माळी महाराज चौक परिसरात तत्कालीन आमदार सुनील धांडे यांच्या निधीतून सन २००५-०६ मध्ये हिंदू स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून या स्मशानभूमीची योग्य देखभाल करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे व झुडपे वाढली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमणाला वाव मिळाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

 नगरपरिषद प्रशासनाची अतिक्रमणास मूक संमती? — रामनाथ खोड

स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत यापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर दि. ०८ जुलै २०२५ रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड यांनी श्री. संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिर बीडचे अध्यक्ष व सचिव यांना नोटीस बजावली होती.

या नोटीसमध्ये स्मशानभूमीच्या पाठीमागील भागात मंदिरासाठी जागा उपलब्ध असतानाही नगरपरिषदेची परवानगी न घेता हिंदू स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर असलेले ‘हिंदू स्मशानभूमी’ हे नाव रंग देऊन पुसण्यात आले असून, त्या ठिकाणी ‘श्री. संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिर बीड’ असे नाव टाकण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच स्मशानभूमीच्या अंतर्गत जागेतून विनापरवाना कच्चा रस्ता तयार करण्यात आल्याचेही नोटीसमध्ये नमूद होते.

सदर बाब गंभीर स्वरूपाची असून, त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवेशद्वारावरील नाव पूर्ववत करावे तसेच विनापरवाना तयार केलेला कच्चा रस्ता हटवावा, अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला होता. या नोटीसीची प्रत शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली होती.

वर्ष उलटले, मात्र कच्चा रस्ता व रहदारी सुरूच

नगरपरिषद प्रशासनाच्या नोटीसीनंतर प्रवेशद्वारावरील नाव पुसण्यात आले असले तरी कच्चा रस्ता अद्याप अस्तित्वात असून, त्यावरून रहदारी सुरू असल्याचा आरोप आहे. या घटनेला वर्ष उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी स्मशानभूमीच्या जागेवर आणखी अतिक्रमण झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

 अधिकृत हद्द निश्चित करून मोजणी करण्याची मागणी

नगरपरिषद प्रशासनाने हिंदू स्मशानभूमीची अधिकृत हद्द निश्चित करून जागेची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करावी. शासकीय अभिलेख, उपलब्ध कागदपत्रे आणि प्रत्यक्ष जागेची स्थिती यांची पडताळणी करून अतिक्रमण आढळल्यास ते तात्काळ हटवावे. तसेच कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय तसेच नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केली आहे.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी