लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन
लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन
२२५ वर्षांची ‘एक गाव–एक गणपती’ परंपरा कायम; गौरीसोबत गणेशाचे विसर्जन, त्यामुळे पाच दिवसांचा गणेशोत्सव
लिंबागणेश : (दि.१९) सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाची तब्बल २२५ वर्षांची ‘एक गाव–एक गणपती’ची परंपरा यंदाही कायम राहिली. सरकार वाड्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची शनिवारी (दि.१९) दुपारी एक वाजता मुख्य आरती झाल्यानंतर छत्री, चौरी, अब्दागिरी, चामर, ध्वज व दंड अशा राजेशाही लवाजम्यासह पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
सरकार वाड्यातून मिरवणूक बाहेर पडताच बँड पथक, टाळ-मृदंगाचा गजर आणि भजनी मंडळींच्या अभंग-गजराने वातावरण भक्तिमय झाले. ढोल-ताशांच्या निनादात लेझीम पथकातील तरुणांनी विविध कसरती सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. ‘मोरया हो मोरया’, ‘जय गजानन मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मिरवणुकीत पंचक्रोशीतील १२ गावांमधील लेझीम पथकांनी सहभाग घेतला. रात्री नऊ वाजता श्री भालचंद्र गणपती मंदिरातील चंद्रपुष्करणी तीर्थावर महाआरती झाल्यानंतर मयुरेश्वराचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
पालखीसमोर धोतराच्या पायघड्यांचा मान परीट समाजाचा
मयुरेश्वराच्या विसर्जन मिरवणुकीतील एक आगळीवेगळी परंपरा आजही लिंबागणेशमध्ये जपली जाते. पालखीसमोर धोतराच्या पायघड्या अंथरून मयुरेश्वराचे स्वागत करण्याचा मान परीट समाज बांधवांना आहे. या परंपरेतून गावातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना अधोरेखित होते.
सजवलेल्या पालखीतुन भाविकांना दर्शन
गावातील मारोती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर मयुरेश्वराची मूर्ती कैकाडवाड्यात नेण्यात येते. तेथे सजवलेल्या बैलगाडीत मूर्ती विराजमान करून पंचक्रोशीतील भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. सजवलेल्या बैलगाडीचा मान कैकाडी समाज बांधवांकडे परंपरेने चालत आला आहे.
वंशपरंपरेने उमेश कानिटकर करतात मयुरेश्वराची मूर्ती
गणेशचतुर्थीच्या दिवशी षोडशोपचार पूजा करून सरकार वाड्यात मयुरेश्वर गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. मयुरेश्वराची गोजिरी मूर्ती वंशपरंपरेने मूर्तिकार उमेश कानिटकर तयार करतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून मूर्तिकामाला सुरुवात होऊन श्रावण वद्य त्रयोदशीला मूर्ती पूर्ण केली जाते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून मूर्तीच्या रंगकामाला सुरुवात होते.
मयुरेश्वराच्या मूर्तीसाठी लागणारे चिखलाचे गोळे पुरविण्याचा परंपरागत मान मुळुक येथील महादेव आहेरकर यांच्याकडे आहे.
गौरीसोबत गणेशाचे विसर्जन; त्यामुळे पाच दिवसांचा गणेशोत्सव
लिंबागणेश गावाने गेल्या २२५ वर्षांपासून ‘एक गाव–एक गणपती’ही परंपरा जपली आहे. गावात अन्यत्र सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही, हे या गावचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच गौरीसोबतच गणेशाचे विसर्जन करण्याची परंपरा असल्याने लिंबागणेशमधील गणेशोत्सव पाच दिवसांचा असतो.
विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन कांकरवाल, पद्माकर आहेर, सचिन धायगुडे, शंकर गलधर तसेच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड, पोलीस हवालदार मुंडे, तांबे यांच्यासह नेकनूर पोलीस ठाण्याचे अंमलदार बाला ढाकणे, पोलीस हवालदार विशाल क्षीरसागर, अविनाश घुंगरट, परझणे, शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Comments
Post a Comment