लिंबागणेश येथे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

लिंबागणेश येथे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

 मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकरी आत्महत्या; सुरक्षेच्या नावाखाली शेतकऱ्यांची अवमानना करणाऱ्या व्यवस्थेचा निषेध : डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.२५) पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके करपली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समिती गठित करणे, लोकप्रतिनिधींचे दौरे, पंचनामे व अहवाल अशा औपचारिक प्रक्रियेत वेळ न दवडता शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विविध सवलती द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवेदन मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी गणपत पोतदार, सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड, पोलिस जमादार उद्धव तांबे, नवनाथ मुंढे यांनी स्विकारले. यावेळी होमगार्ड शाळीग्राम घरत, गणेश कुलकर्णी, श्रीराम वाघमारे उपस्थित होते.

या मागणीसाठी अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शुक्रवार, दि.२५ रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन पीक घेऊन "कोरडा दुष्काळ जाहीर करा". रखडलेला पिक विमा जमा करा ' अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या, हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या अशी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले.

रखडलेला पीकविमा तातडीने द्या; गेल्या वर्षाची हेक्टरी १७,५०० व यंदा हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकरी आत्महत्या; बीडमध्ये सर्वाधिक १४९

नैसर्गिक संकट, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यात ६५३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४९ आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार बीड १४९, छत्रपती संभाजीनगर १३८, धाराशिव ८८, नांदेड ८२, जालना ६१, लातूर ४६, परभणी ४५ आणि हिंगोली ४४, अशी एकूण ६५३ शेतकरी आत्महत्यांची नोंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 दुष्काळ पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरही संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या नावाखाली शेतकऱ्यांना दोरखंड व बॅरिकेड्स लावून दूर ठेवणे, पोलिसांकडून झाडाझडती घेणे तसेच मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करणे, या प्रकाराचा डॉ. गणेश ढवळे यांनी निषेध केला.

“शेतकऱ्यांकडे अतिरेकी, माओवादी किंवा नक्षलवादी असल्यासारखे पाहणाऱ्या व्यवस्थेचा निषेध करतो. अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी आलेल्या दौऱ्यात त्यांनाच सुरक्षेच्या नावाखाली दूर ठेवणे ही अवमानकारक बाब आहे,”अशी भूमिका डॉ.गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.

शासनाने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा व नुकसानभरपाईची प्रलंबित रक्कम अदा करावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राजेभाऊ गिरे , भगवान मोरे, सोमीनाथ कोल्हे, सय्यद अकबर,कृष्णा पितळे, विक्रांत वाणी, संतोष भोसले,शंकर वाणी, दादा गायकवाड, रामदास मुळे, संभाजी वाणी, कृष्णा वायभट, अशोक गोंडे, 
 यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी