बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या:-डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या
डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी; क्रीडांगणास जमीन देण्याची मागणी
बीड (प्रतिनिधी)
दि.२५ : तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयांना स्वतंत्र व हक्काची इमारत नसल्यामुळे नागरिकांना महसुली कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बीड परिसरातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणास आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंगळवारी (दि.२५) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली.
यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्यासह भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, शुभम कातांगळे उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले की, बीड तालुक्यातील अनेक महसूल मंडळ कार्यालयांचे कामकाज सध्या इतर तात्पुरत्या जागांमध्ये सुरू आहे. स्वतंत्र व सुसज्ज इमारतींअभावी शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. याशिवाय प्रशासकीय कामकाज करताना कर्मचाऱ्यांनाही मर्यादा येतात. त्यामुळे तालुक्यातील मंडळ कार्यालयांना हक्काच्या इमारती मिळणे गरजेचे असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या सर्व कामांना तातडीने निधी व मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
या मंडळांसाठी इमारतींची गरज
बीड, पाली, मांजरसुंबा, चौसाळा, लिंबागणेश, घाटसावळी, नाळवंडी, म्हाळसजवळा, चऱ्हाटा, राजुरी (न.), पारगाव सिरस, खालापुरी (ता. शिरूर का.) या मंडळ अधिकारी कार्यालयास नवीन इमारतींची आवश्यकता आहे. तसेच, रायमोहा (ता.शिरूर का.) येथील कार्यालयाची दुरुस्ती करण्याची अत्यंत गरज असून निधी मागणी करण्यात आली आहे.
क्रीडांगणासाठी जमीन उपलब्ध करून द्या
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Comments
Post a Comment