अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे. या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे.
या दुर्घटनेबाबत बोलताना सोनवणे म्हणाले की, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहणे गंभीर बाब आहे. आगीत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून, या घटनेमागे निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या सचिवांनी तातडीने अमरावती येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच जखमी बालकांवर आवश्यक ते सर्व उपचार शासकीय खर्चाने करण्यात यावेत आणि याबाबत अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
दरम्यान, या दुर्घटनेत ३६ बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची बाब दिलासादायक आहे. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग आणि सुरक्षा उपाययोजनांचे तातडीने ऑडिट करण्यात यावे, अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मागणीही त्यांनी केली.
“तीन निष्पाप बालकांचा मृत्यू केवळ दुःख व्यक्त करून विसरला जाऊ नये. घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोष निश्चित करणे आणि जबाबदारी ठरवणे आवश्यक आहे,” असे नितीन सोनवणे यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment