प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा

प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा! 

छाया पांचाळ, शेख मुस्कान व संध्या गायकवाड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या निलंबनाची मागणी; जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
बीड : (दि. २४)बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या उपचारादरम्यान कथित हलगर्जीपणाच्या घटना समोर येत असल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली. या मागणीसाठी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली.

छाया गणेश पांचाळ व शेख मुस्कान यांच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूच्या घटनांसह वडवणी येथील १९ वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या कथित गुंतागुंतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संध्या गायकवाड यांच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य राहिल्यामुळे संसर्ग झाल्याचा आरोप असून, त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले.

या कथित प्रकरणांमध्ये नेमकी वैद्यकीय जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी आणि संबंधितांच्या वैद्यकीय परवान्याबाबत सक्षम प्राधिकरणामार्फत नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

२४ कोटींच्या माता व बाल रुग्णालयात सुविधांचा प्रश्न

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सुमारे २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या माता व बाल रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाच्या घटनांमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले.

गेल्या महिन्यात शेख मुस्कान यांच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर संध्या गायकवाड यांच्या प्रकरणानेही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे केवळ चौकशी समिती स्थापन करून विषय प्रलंबित न ठेवता चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वीच्या घटनांचीही चौकशी करा

बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलांच्या मृत्यूच्या यापूर्वीच्या घटनांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. छाया पांचाळ व मुस्कान शेख यांच्या मृत्यूच्या घटनांनंतर नातेवाईक व सामाजिक संघटनांकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, चौकशीच्या नावाखाली विलंब होत असल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निलंबनाची मागणी

वारंवार कथित हलगर्जीपणाच्या घटना समोर येत असल्याने संबंधित प्रकरणांची स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांना निलंबित करावे, अशी मागणी पालकमंत्री सुनेत्रा पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, रामनाथ खोड, माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), सादेक सय्यद ( शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), बाळासाहेब मोरे पाटील ( शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष), किश्किंधा पांचाळ ( जिल्हाध्यक्ष विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज बीड), सुनिता पांचाळ, रामधन जमाले ( जिल्हाध्यक्ष इंटक बीड), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे, हनुमान घोडके,प्रा.आबासाहेब जाधव,भीमराव कुटे , शंकर घाडगे, सरफराज खान रामचंद्र धुमाळ, विश्वास भोरे आदी सहभागी झाले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी