शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन!

शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन!

नाकर्तेपणा लपविण्यासाठी काढलेला आदेश तातडीने रद्द करा : डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. २४) जिल्हा परिषद शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींनी शाळेच्या वेळेत व्हिडिओ व फोटो काढण्यास बंदी घालण्याच्या आदेशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे यांनी सोमवारी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जाऊन 'सविनय कायदेभंग' आंदोलन केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन डॉ. ढवळे यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील परिस्थितीचे व्हिडिओ व फोटो काढले. हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री बीड तथा शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे केली.

नेमका आदेश काय?

बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांनी केंद्रप्रमुखांना दिलेल्या पत्रानुसार, शाळेच्या वेळेत बाहेरील व्यक्तींनी शाळेत उपस्थित राहून व्हिडिओ अथवा फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारची कोणतीही परवानगी मुख्याध्यापकांनी देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांच्या बैठकीतील सूचनेनुसार देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

 ‘कॅमेरा बंदी म्हणजे वास्तव लपविण्याचा प्रयत्न’

“शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि भयमुक्त शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र शाळांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या, नादुरुस्त स्वच्छतागृहे, जीर्ण इमारती आणि इतर मूलभूत सुविधांची स्थिती समोर येऊ नये म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे,” असा आरोप डॉ. ढवळे यांनी केला.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कॅमेऱ्यामुळे घसरत नसून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घसरत आहे. त्यामुळे माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना शाळांमधील वस्तुस्थिती पाहण्यापासून रोखण्याऐवजी प्रशासनाने मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

आदेश रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा

आज दि.२४ सोमवार रोजी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत फोटो व व्हिडिओ काढून या आदेशाचा सविनय कायदेभंग केला आहे. हा लढा शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने सुरू असून आदेश रद्द होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल,” असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला.


अभिजित दिपके यांच्या ' स्कुल ठीक करो ' अभियानाला पाठिंबा ; दिपके वरील शाळा तपासणी दरम्यान दाखल गुन्हा मागे घ्या :- डॉ.गणेश ढवळे 

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या सरकारी शाळांचे वास्तव दाखवत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक सुधारणा कराव्यात या प्रमुख मागणीसाठी देशभरात सुरू केलेल्या " स्कुल ठीक करो" अभियानाला पाठींबा असुन त्यांच्यावरील लातुर जिल्ह्यातील औसा येथील शाळा तपासणी केल्यामुळे दाखल करण्यात आलेला गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी