कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला
कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला!
भाग्यश्री धनवडे यांची जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड
गेवराई प्रतिनिधी :गेवराई तालुक्यातील कोमलवाडी गावचे सुपुत्र श्री. शंकर सूर्यकांत धनवडे यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री शंकर धनवडे यांची गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे धनवडे कुटुंबीयांसह संपूर्ण कोमलवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सौ. भाग्यश्री धनवडे यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षण क्षेत्रात शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले असून, आता गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या पार पाडणार आहेत.
शिक्षक म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी. ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी सौ. भाग्यश्री धनवडे यांना मिळाल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीमुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच कोमलवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोमलवाडी गावाने विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली असून, आता शिक्षण क्षेत्रातही धनवडे कुटुंबीयांनी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. भाग्यश्री धनवडे यांच्या या यशामुळे गावातील इतर तरुण-तरुणींनाही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सौ. भाग्यश्री शंकर धनवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून, गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या आगामी शैक्षणिक सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment