परळी नगरपालिकेचा कोंडवाडा नेमका कुठे? मोकाट जनावरांचा शहरात हैदोस; दीपक देशमुख यांचा सवाल
परळी नगरपालिकेचा कोंडवाडा नेमका कुठे? मोकाट जनावरांचा शहरात हैदोस; दीपक देशमुख यांचा सवाल
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरासह प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे बिनधास्तपणे वावरत असल्याने नागरिक, पदचारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपालिकेच्या मोकाट जनावरांसाठीच्या कोंडवाड्याच्या कार्यक्षमतेवर माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम काही दिवस चालविण्यात आली; मात्र त्यातून अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर शहरात मोकाट गायी, बैल व इतर जनावरांचा वावर वाढला असून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकासह मुख्य मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर पदचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपालिकेने मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू केला आहे का, की तो केवळ कागदोपत्रीच आहे, असा सवाल करत देशमुख यांनी या कामावर झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, जनतेने मोठ्या विश्वासाने नगराध्यक्षपदी निवडून दिल्यानंतरही शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली. मोकाट जनावरे पकडून त्यांची योग्य व्यवस्था करावी, वाहतूक सुरळीत ठेवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या आरोपांबाबत परळी नगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
Comments
Post a Comment