मुस्कान शेख मृत्यू प्रकरणाची धाराशिवच्या त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी; उद्या बीडमध्ये जबाब नोंदविणार

मुस्कान शेख मृत्यू प्रकरणाची धाराशिवच्या त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी; उद्या बीडमध्ये जबाब नोंदविणार

स्थानिक चौकशी समितीवर नातेवाईकांचा आक्षेप; वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र समितीची नियुक्ती : डॉ. गणेश ढवळे
बीड:-(दि.३०) : बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या मुस्कान शेख (वय २४, रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता धाराशिव येथील त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. स्थानिक चौकशी समितीवर नातेवाईकांनी निष्पक्षतेबाबत आक्षेप घेतल्यानंतर वरिष्ठ स्तरावर ही समिती नियुक्त करण्यात आली असून, उद्या शुक्रवार (दि. ३१ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हा रुग्णालयातील व्हीसी हॉलमध्ये संबंधितांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.

मुस्कान शेख यांच्यावर १० जुलै रोजी नव्या माता व बाल रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी रुग्णाची भेट घेत संवाद साधला होता. मात्र शस्त्रक्रियेनंतर मुस्कान शेख यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, २० जुलै रोजी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान नातेवाईकांनी स्थानिक चौकशी समितीतील सदस्यांवर आक्षेप नोंदवत ही समिती निष्पक्ष चौकशी करणार नसल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश ढवळे यांनी दिलेल्या निवेदनासह समाजमाध्यमांवरील नातेवाईकांच्या प्रतिक्रियांचा विचार करून प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धाराशिव जिल्हा रुग्णालयातील डॉ. इस्माईल मुल्ला (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. नानासाहेब गोस्वामी (शल्यचिकित्सक) आणि डॉ. प्रशांत रेवडकर (भिषक) यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

या समितीसमोर जबाब नोंदविण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका तसेच संबंधित ओटी व आयसीयू कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता व्हीसी हॉल, जिल्हा रुग्णालय, बीड येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, "केवळ चौकशी समित्यांचा फार्स नको, दोषींवर कठोर कारवाई करा," अशी भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी पालकमंत्री ना. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आढावा बैठकीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी