बीडच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डॉ. ज्योतीताई मेटे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन
बीडच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डॉ. ज्योतीताई मेटे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन
बीड ( प्रतिनिधी) शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पशुसंवर्धन तसेच पुनर्वसनाशी संबंधित सहा महत्त्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये बीड शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक आदी प्रमुख ठिकाणी महिलांसाठी आधुनिक व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी विक्रीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बीड पंचायत समितीच्या जुन्या आवारात अथवा 'उमेद' अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ किंवा मॉल उभारण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय मौजे करचुंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे श्रेणी-२ वरून श्रेणी-१ मध्ये रूपांतर करून परिसरातील शेतकरी व पशुपालकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. करचुंडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने तो तातडीने मंजूर करून स्थानिक नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
खटकाळी तलाव बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कपिलधारवाडी येथील जमिनीला भेगा पडल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महसूल प्रशासनाला तातडीने आवश्यक निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली.
या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाल्यास बीड शहर व तालुक्यातील महिला, शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसंग्राम चे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोणाकडे, नारायणराव काशीद, अनिल घुमरे ,सुहास पाटील, ज्ञानेश्वर कोकाटे पंडितराव माने, मनोज जाधव, मनीषा कूपकर, गणेश मोरे ,गणेश साबळे, शैलेश सुरवसे, पांडुरंग बहिर आदी उपस्थित उपस्थित होते.
Comments
Post a Comment