आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे
बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या २३ जून 'आंतरराष्ट्रीय विधवा दिना' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे.
शासन स्तरावर एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी विविध सकारात्मक पावले उचलली जात असून, राज्याचे महिला व बालविकास विभाग एकल महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी आयोजित होणारा 'एकल महिला दिवस' हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, एकल महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम ठरावा, असे बाजीराव ढाकणे यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, बीड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित, निराधार व इतर एकल महिलांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करावा. तसेच त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध शासकीय योजनांबाबतच्या समस्या लेखी स्वरूपात नोंदवून त्या एकत्रित करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात याव्यात, जेणेकरून त्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतील.
एकल महिलांना सामाजिक सन्मान, आर्थिक स्वावलंबन, सुरक्षितता, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचेही ढाकणे यांनी अधोरेखित केले.
'एकल महिला दिवस' हा एकल महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात सकारात्मक जनजागृती घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास व्यक्त करत श्री. बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment