हिवरा बु. येथे 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' साजरे
हिवरा बु. येथे 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' साजरे
एकल महिलांना मशरूम शेती व शासकीय योजनांचे मार्गदर्शन
बीड (प्रतिनिधी):येथे २३ जून रोजी 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था, हिवरा बु. आणि ग्रामपंचायत हिवरा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित तज्ज्ञांनी एकल महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि कायदेशीर हक्कांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामसेवकांनी उपस्थित महिलांना शासकीय योजना, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीबाबत सविस्तर माहिती दिली.
अंबाजोगाई येथील मशरूम शेती समन्वयक सुनंदा लोखंडे यांनी एकल महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने मशरूम शेतीविषयी सखोल मार्गदर्शन केले. मशरूम शेतीचे उत्पन्न, लागणारे भागभांडवल आणि गुंतवणूक याबद्दल सांगतानाच, कंपनी मशरूमची खरेदी कशी करते आणि यासाठी २० वर्षांचा करार कसा केला जातो, याविषयी त्यांनी महिलांना प्रोत्साहित केले.
'कोरो इंडिया'च्या समन्वयक रुक्मिणी नागापुरे यांनी एकल महिलांच्या मुलांसाठी बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या २,२०० रुपये अनुदानाचा लाभ कसा घ्यावा, याबाबत माहिती दिली. तसेच रेशन कार्ड, घर पती-पत्नीच्या संयुक्त नावावर असणे आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र का गरजेचे आहे, यावर त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.
सत्यभामा सौंदरमल यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकल महिलांविषयीच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी महात्मा फुलेंचे विचार, विधवा पुनर्विवाह आणि महिलांचे संपत्तीवरील अधिकार या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या मंगल चांदमारे, धम्मा घायाळ, ग्रामपंचायत सदस्य वामन डावरे, विजय डावरे, आणि निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्या ज्योती डावरे व नारायण डावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अंगणवाडी मदतनीस मीरा लोखंडे, रोशनी खंडागळे, मीरा अवघडे, कमल सुभाष काळे, जिजाबाई डावरे, सखुबाई मुळे, ज्योती गणेश जैद, मुक्ताबाई जैद, सुलाबाई वजीर यांच्यासह हिवरा बु. परिसरातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment