पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी शहरातील साठेनगर परिसरात विषारी हातभट्टी दारू पिल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, नगरसेवक नितीन रोडे, रतन आदोडे,भैय्यासाहेब आदोडे, बालाजी मस्के,नवनाथ मस्के, नागनाथ मस्के, दीपक लोंढे, ऋषिकेश क्षीरसागर, आनंद कांबळे, दर्शन लोंढे, बाळू मस्के, संजय कुमार शिंदे, बाबुराव मस्के, सोमनाथ मस्के व सर्व महिलाकेली आहे.

पुण्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळीतही अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, साठेनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम हातभट्टी दारूची विक्री सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी, निवेदने आणि मोर्चे काढूनही पोलिसांनी प्रभावी कारवाई केली नाही.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत, "परळीत संपूर्ण दारूबंदी करा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवू", असा इशारा दिला. यावेळी महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साठेनगर परिसरातील हातभट्टी दारू विक्रीबाबत अनेकदा पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. मात्र संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. त्यामुळे या मृत्यूस जबाबदार असलेल्या दारू विक्रेत्यांवर तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

पुणे विषारी दारू प्रकरणात ज्या पद्धतीने दारू विक्रेत्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच धर्तीवर परळीतील या प्रकरणातही संबंधित दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परळी शहरात खळबळ उडाली असून अवैध हातभट्टी दारूविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी