एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर
बीड | प्रतिनिधी
अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड लोकसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वीर यांनी म्हटले आहे की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून, घटनात्मक आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे.
बीड जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, गेवराई, धारूर, पाटोदा, आष्टी तसेच इतर तालुक्यांतील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकर विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अनुसूचित जातींचे घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी हा महामोर्चा निर्णायक ठरणार असल्याचे सांगत, "३० जून रोजी मुंबईत होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीची ताकद दाखवा," असे आवाहन पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले.
Comments
Post a Comment