लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती !
दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता २० लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश :- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.२६) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. याचा मोठा फटका वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती यासह परिसरातील ग्रामस्थ, दुग्ध उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक, बाजारहाट करणारे नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना बसत होता.
रस्ता व पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना प्रशासनाकडून केवळ पाहणी व आश्वासनांवर वेळ जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० सप्टेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत "आता तरी अजितदादा पाटील का?" असा सवाल उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल, तलाव व बंधाऱ्यांच्या तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. त्यानंतर लिंबागणेश ते बोरखेड रस्ता व पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजना लेखाशीर्ष ३०५४-३१ २१ (ग्रामीण रस्ते विकास योजना) अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
बांधकाम विभाग क्रमांक १, जिल्हा परिषद बीडचे कार्यकारी अभियंता मोमीन सय्यद शकील अहमद यांनी याबाबत मंजुरीचे पत्र आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना दिले होते. त्यानुसार आता पावसाळ्यापूर्वीच रस्ता व पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्याने ग्रामस्थांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.
"ग्रामस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश मिळाले असून लोकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला," असे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment