अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड
अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड
बौद्धांसह 58 जाती समूहाने एकत्र येण्याची गरज
बीड (प्रतिनिधी) 22 जुन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने शोषण केलेल्या जाती समूहांना, सामाजिक आर्थिक धार्मिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या आघाडीवर येण्यासाठीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आर्थिक मागास प्रवर्ग या तीन प्रवर्गांची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्मिती सभेत, अस्पृश्य-शूद्रातीशूद्र समाजास न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवाची परकाष्टा केली. बाबासाहेब आपल्या भाषणात वेळोवेळी सांगायचे की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठीही तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनुसूचित जाती हा प्रवर्ग निर्माण केला. हा प्रवर्ग मानवी संवेदना नसणाऱ्या जातींचा एक समूह आहे. हा समूह प्रगतीपथावर असून, या जातीतील तिसऱ्या पिढीने मोक्याच्या जागा हस्तगत केल्यानेच, येथील वर्णवादी मनुवाद्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. म्हणूनच अनुसूचित जाती प्रवर्गातील काही कर्मठवाद्यांना हाताशी धरून या प्रवर्गाचे आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवेदनात हे स्पष्ट केले आहे की, उपवर्गीकरण हे जर समूहास मान्य असेल तरच करावे, तेही लोकसंख्येच्या आधारावर परंतु काही जातीयद्वेषी मानसिकता असलेल्या आरएसएस च्या हस्तकाच्या मताप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर 58 जातींवर अन्याय करुन उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अनुसूचित जाती प्रवर्गातील वंचित-उपेक्षितांचे भवितव्य अंधकारमय करणारा असून अनुसूचित जाति उपवर्गीकरण हे तर फक्त निमित्त आहे कारण इथल्या प्रस्थापितांना हे आरक्षणच संपवायचं आहे म्हणून आता अनुसूचित जातीतील बौद्धांसह 58 जाती समूहानें एकत्र येऊन आधुनिक पेशवाई गाडत लोकशाही मार्गाने लढा उभारून आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज रहावे.
असे आव्हान भिम स्वराज्य सेनेचे /संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
Comments
Post a Comment