लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते 
बीड, दि. 21 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिरात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष पूजा-अर्चना करून गणपती बाप्पाच्या चरणी साकडे घालण्यात आले. याच पवित्र प्रसंगी असंघटित मजूर, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी मा. राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होऊन संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट व्हावेत, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, असंघटित मजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शासकीय योजना, सुविधा व अधिकारांची माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने इंटकच्या वतीने "असंघटित मजूर व शेतकरी कामगार नोंदणी जनजागृती अभियान" संपूर्ण बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत प्रत्येक गावात जाऊन शेतकरी, मजूर, कामगार, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, असंघटित कामगारांची नोंदणी करणे, त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे अभियान बीड जिल्ह्यातील सर्व तालुके व गावांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविले जाणार असून ते इंटक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी.सजीवा रेड्डी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंटक डॉ. कैलास भाऊ कदम, काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रंजनीताई पाटील, माननीय बीडची माजी पालकमंत्री अशोक दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदित्य दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे.

या धार्मिक व जनजागृती कार्यक्रमास ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव, भीमरावजी कुठे, हरिदास पवार महाराज, युवक काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके तसेच इंटकचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक, महिला आणि नागरिकांना या जनजागृती अभियानात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. "प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना आणि हक्क पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविले जात असून, समाजहित आणि जनकल्याणासाठी सर्वांनी या उपक्रमाला साथ द्यावी," असे त्यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या विचारांना बळ देत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक प्रभावीपणे उभारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments