आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणी
आ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन
पाटोदा :- (दि.३०) आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या, इमारतविरहित तसेच नव्याने वर्गखोल्यांची आवश्यकता असलेल्या शाळांसाठी १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात आष्टी तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ८७ लाख, पाटोदा तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ३७ लाख आणि शिरूर तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ९० लाख अशा एकूण १४ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

आष्टी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७६ शाळा असून, मोडकळीस आलेल्या ११ शाळांमधील ३१ वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच विद्यार्थी संख्या वाढलेल्या ३ शाळांमध्ये अतिरिक्त ३ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ४ कोटी ८ लाख रुपये तसेच १८ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपये अशा एकूण ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पाटोदा तालुक्यातील १७८ जिल्हा परिषद शाळांपैकी मोडकळीस आलेल्या ११ शाळांमधील १९ वर्गखोल्या व विद्यार्थी संख्या वाढल्याने ११ शाळांमध्ये ११ अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आवश्यक आहे. यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये तसेच २३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ७७ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर शिरूर तालुक्यातील १८९ शाळांपैकी ५ शाळा इमारतविरहित असून, १८ शाळांमधील २९ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. तसेच ३ शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ४ कोटी ४४ लाख रुपये व १८ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपये, असा एकूण ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून या कामांना प्राधान्याने मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी