न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी

न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी

आनंदराज आंबेडकर यांचा शब्द; आर्थिक मदत, शासकीय नोकरी व घरकुलासाठी प्रशासनाला सूचना
बीड प्रतिनिधी :
बीड शहरातील मातंग समाजातील युवक उमेश दळवी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर दखल घेत दळवी कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना धीर दिला. “या प्रकरणात पूर्ण न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.

रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी तसेच बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोटू वीर यांनी उमेश दळवी यांच्या पत्नी, आई, भाऊ व बहिणीची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती आनंदराज आंबेडकर यांना दिली. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तात्काळ पोलीस प्रशासन, समाजकल्याण विभाग तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दळवी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी, तातडीची आर्थिक मदत तसेच घरकुल योजना मंजूर करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिल्या. समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणारी आर्थिक मदत तात्काळ वितरित करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रकरणातील इतर संशयित आरोपींनाही ताब्यात घेण्यात यावे, पुरवणी एफआयआरमध्ये संबंधितांची नावे समाविष्ट करावीत तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये अधिक कठोर कलमे लावून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी तसेच पदाधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी