जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे

जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे 
बीड | प्रतिनिधी

जांब (ता. शिरूर) येथील अनुसूचित जातीच्या ढाकणे कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार माणिक ढाकणे, विजय ढाकणे व संगीता माणिक ढाकणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. किरकोळ कारणावरून — ढाकणे कुटुंबीयांच्या शेळ्या आरोपींच्या दारासमोर गेल्याच्या कारणावरून — हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात तब्बल 9 महिला व 11 पुरुष सहभागी असल्याचा आरोप असून संपूर्ण घटना घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे रात्री बीट अंमलदारांनी वाद मिटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील चौकात बैठक बोलावून तुषार ढाकणे यांना सार्वजनिकरित्या महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, गावातील सरपंचांनी “मारा, काय करतोय बघून घेऊ” असे म्हणत आरोपींना प्रोत्साहन दिले. तसेच शिरूर पोलीस ठाण्यात खोटा छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. पीडितांना पोलीस स्टेशनला जाऊ नये म्हणून रस्त्यात लोक उभे करून दहशत निर्माण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पीडित कुटुंबीयांनी बीड येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित बीट अंमलदार व शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला.

पीडितांकडे मारहाणीचे CCTV फुटेज, फोटो व अन्य पुरावे उपलब्ध असून अनुसूचित जातीच्या कुटुंबाला घरात घुसून तसेच गावच्या चौकात सार्वजनिकरित्या अपमानित करून मारहाण करणे ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया पॅंथर सेनेने दिली आहे.

 ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या प्रमुख मागण्या :
▪️ सर्व आरोपींवर तात्काळ ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत.
▪️ आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी.
▪️ पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे.
▪️ खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.

“दलितांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. ऑल इंडिया पॅंथर सेना पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभी आहे,” असा इशारा महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी