मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे
मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयातील कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले आहे. एका कामानिमित्त कार्यालयाला भेट दिल्यानंतर या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे.
वर्षाताई जगदाळे यांनी सांगितले की, शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांचे छायाचित्र लावण्याची परंपरा असताना, संबंधित कार्यालयात अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गौरवाचे आणि सत्काराचे फोटो लावले आहेत. हे फोटो महापुरुषांच्या छायाचित्रांपेक्षा अधिक ठळकपणे लावण्यात आल्याने, “हे कार्यालय शासकीय आहे की खाजगी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयाला महापुरुषांची छायाचित्रे भेट देऊन योग्य शिस्त लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, कार्यालयातील कथित गोंधळ आणि भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्याने किती फायली काढली, किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची माहिती संकलित केली जात असून, लवकरच या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी सांगितले.गोरगरीब आणि गरजू नागरिकांना न्याय मिळावा, तसेच शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी हा लढा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
Comments
Post a Comment