अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी; बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन


बीड प्रतिनिधी : - राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून बीड जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात लेक लाडकी अभियानाचे मार्गदर्शक प्राचार्य डी जी तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या उष्णतेमुळे अंगणवाड्यांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये वायुवीजन, पंखे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे. परिणामी उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे आदी आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली असताना अंगणवाड्या सुरू असल्याने बालकांच्या उपस्थितीतही घट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंगणवाड्यांना उन्हाळी सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, ‘ टेक होम रेशन ’च्या माध्यमातून बालकांना पोषण आहार उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही निवेदनातून करण्यात आली. 
       यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी