बीड शहर स्वच्छतेत आधुनिकतेची मोठी झेप : घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित, स्वच्छता सभापती शेख निजाम
बीड | प्रतिनिधी
बीड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, स्वच्छता विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील सर्व घंटागाड्या व स्वच्छता संबंधित वाहनांवर अत्याधुनिक GPS प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हा उपक्रम मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार, आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक,शेख मुजीबभाई, सभापती बाळासाहेब गुंजाळ,संजय उडाण,जकी सौदागर,गटनेता फारूक पटेल यांच्या सहकार्याने तसेच स्वच्छता सभापती शेख निजाम व मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, पारंपरिक पद्धतींमध्ये अनेक मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर GPS प्रणालीचा अवलंब करून स्वच्छता व्यवस्थापनात सुसूत्रता, शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक घंटागाडी व स्वच्छता वाहनाची हालचाल, त्यांचे वेळापत्रक, तसेच कामाची अंमलबजावणी यावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणते वाहन कोणत्या भागात किती वेळ कार्यरत आहे, काम पूर्ण झाले आहे की नाही, याची अचूक माहिती प्रशासनाला रिअल-टाइममध्ये मिळणार आहे.!
या नव्या तंत्रज्ञानामुळे स्वच्छता कामकाजातील ढिलाई, अनियमितता आणि गैरव्यवहाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता सेवा वेळेवर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचवण्यास या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे.!
स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी यावेळी सांगितले की, “GPS प्रणालीच्या वापरामुळे स्वच्छता व्यवस्थापन अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल. नागरिकांना वेळेवर सेवा देणे आणि शहर अधिक स्वच्छ ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, या प्रणालीमुळे त्या दिशेने निश्चितच सकारात्मक बदल घडेल.” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, लवकरच शहरातील सर्व घंटागाड्यांवर पूर्णपणे GPS प्रणाली कार्यान्वित करून त्याचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात येणार आहे.!
यावेळी स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्यासह, मुकादम तसेच घंटागाडी चालक उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे बीड शहर स्वच्छतेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत पुढे जात असून, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा ठोस प्रयत्न सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment