जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन; ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित
बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सायंकाळी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाले होते. जिल्हा कामगार कार्यालयातील कथित एजंटशाही, भ्रष्टाचार आणि बोगस लाभार्थी प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी कामगार आक्रमक झाले होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आंदोलनकर्त्यांना कळविण्यात आले की, संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने शासन दरबारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आवश्यक ती चौकशी व कारवाई लवकरच करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने काही कालावधीची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी सुमारे सहा वाजता अंतिम निवेदन सादर करून आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले म्हणाले, “कामगारांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
या आंदोलनात विविध कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. इंटक जिल्हा सचिव सखाराम बेंगडे, उपतालुका अध्यक्ष सदाम शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, भीमराव कुटे, राजू जोगदंड, पठाण रफिक, बाबासाहेब मोरे, किस्किंदा पांचाळ, सीताताई भोसले, शेख युनूस, डॉ. संजय तांदळे, बाळासाहेब मोरे पाटील, शिवाजीराव कोठुळे, दादासाहेब गवेर, गणेश आहेर, नितीन सांगळे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment