लिंबागणेश येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; भालचंद्र विद्यालयात पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन
लिंबागणेश(दि.०१): गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (दि.०१) बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रूपाली चिटकुलवार यांनी केले.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती देशपांडे आणि डॉ. सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर,कदम, शिक्षक ,विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित : डॉ. क्रांती देशपांडे, डॉ. सुनिता बारकुल
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. क्रांती देशपांडे आणि डॉ. सुनिता बारकुल यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment