आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणी टिप्परची समोरा -समोर धडक,आई आणी मुलाचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन आई आणि मुलाचा कार मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला .
हा अपघात इतका भीषण होता काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली .
आष्टी पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर काळाने घाला घातला .
मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात असताना कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली असून या भीषण धडकेत कारने लगेच पेट घेतला, आणि या कारमधून आई आणि मुलाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले .
अपघाताची एवढी भीषणता होती की, कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.
या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला अथक तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
मुलाचे वडील कीर्तनात असतानाच काळाचा घाला
श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समिती मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
Comments
Post a Comment