बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती
बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
बीड (प्रतिनिधी)
दि.२६ : शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कंकालेश्वर मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात गुरुवारी (दि.२६) साजरा करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर कंकालेश्वर मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. आरतीनंतर पंकजाताई मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कंकालेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून हजारो रामभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीभाव, शिस्त आणि उत्साह यांचे सुंदर दर्शन घडले. यावेळी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्वप्नील गलधर, आदित्य सारडा, नगरसेविका डॉ.सारिका क्षीरसागर, भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा, चंद्रकांत नवले, परशुराम गुरखुदे, सांगिता धसे, डॉ.अभय वनवे यांच्यासह सर्व पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
‘तुम्ही आम्ही बीडकर’ यांच्या वतीने प्रभू श्रीराम नवमीनिमित्त बार्शी नाका येथील गणपती मंदिरातून भव्य दुचाकी रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित राहून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संपूर्ण शहर श्रीराममय झाले होते.
Comments
Post a Comment