डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे आयोजन



बीड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आयोजित केली जात आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही जिल्ह्यातील इयत्ता 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. तालुकास्तरीय पहिली फेरी दिनांक 30 मार्च 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या फेरीतून प्रत्येक तालुक्यातील अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत.

अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या अकरा तालुक्यांतील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय, बीड येथे पार पडणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी 3,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी 50 रुपये ठेवण्यात आले असून, बीड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी संयोजक आयु. मनोज वाघमारे, आयु. सुमित जोगदंड सर, स्पर्धा समिती प्रमुख प्रा. शशिकांत जावळे, प्रवीणकुमार तरकसे सर, प्राचार्य प्रदीप गाडे, श्री भारत मगर, महादेव इनकर, प्रा. अशोक गायकवाड यांच्यासह सर्व समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.
अधिक माहितीसाठी स्पर्धा समिती प्रमुख
प्रा. शशिकांत जावळे (मो. 9423473204) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी