कु. प्रणया रोडे हिचे NMMS परीक्षेत नेत्रदीपक यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली कामगिरी



परळी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षेत कन्हेरवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील सोमनाथ विद्यालयाची प्रज्ञावंत विद्यार्थीनी कु. प्रणया लहुदास रोडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NMMS ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने सन 2007-08 पासून दरवर्षी घेतली जाते. आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षणासाठी दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींवर मात करत शिक्षणाची वाट अधिक आत्मविश्वासाने चालता येते.

इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत कु. प्रणया हिने विशेष प्राविण्य मिळवत आपल्या शाळेचा व गावाचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशाबद्दल सोमनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेख सर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षकवृंदांनीही तिचे कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनी तिच्या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

प्रणया हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे कु. प्रणया रोडे हिने सिद्ध करून दाखवले आहे. तिचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी