काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंटककडून तीव्र निषेध - रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष
बीड प्रतिनिधी : पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रानंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने मा. गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. माध्यमांवर चर्चा करून राजकीय भूमिका मांडणे हा गुन्हा ठरू शकत नाही. अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यावर हल्ला करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असून ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे.
या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लोकशाही पद्धतीने मतभेद व्यक्त करण्याऐवजी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे ही गंभीर बाब आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
इंटकच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—
संबंधित हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
घटनेची सखोल चौकशी करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी.
राज्यातील सर्व राजकीय व्यक्ती व प्रवक्त्यांना सुरक्षिततेची हमी द्यावी.
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
“लोकशाही मार्गाने संघर्ष करणे हीच आमची भूमिका असून हिंसाचाराला कोणत्याही परिस्थितीत समर्थन दिले जाऊ शकत नाही. सदर घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत,” असे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी स्पष्ट केले.
सदर प्रकरणी मा. गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही इंटकच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment