जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश
जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश
जिल्हा परिषद कार्यालयातील “शौचालय स्वच्छता” गांधीगिरी आंदोलनास यश :- डॉ. गणेश ढवळे
बीड :- (दि. ३१)बीड जिल्हा परिषद अंतर्गत दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात आलेली “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सहकाऱ्यांसह गांधीगिरी आंदोलन केले.
दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून, काही ठिकाणी उपलब्ध शौचालये वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील सीईओ यांच्या केबिनसमोरील पुरुष शौचालयाची स्वच्छता करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सीईओ जितिन रहेमान यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतेबाबत कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
संबंधित विभागाकडून सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवणे, आजारांचा प्रसार रोखणे व आरोग्यदायी शालेय वातावरण निर्माण करणे या उद्देशाने शाळा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच शाळांची नियमित तपासणी केली जाणार असून, दुर्लक्ष आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या निर्णयाबाबत डॉ. गणेश ढवळे यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले आहे.
Comments
Post a Comment