पाटोदा–मांजरसुंबा महामार्गावर अपघातांची साखळी कायम,जाधववस्ती जवळ ट्रक–दुचाकीचा भीषण अपघात; संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू
पाटोदा–मांजरसुंबा महामार्गावर अपघातांची साखळी कायम
जाधववस्ती जवळ ट्रक–दुचाकीचा भीषण अपघात; संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू
बीड प्रतिनिधी :- ( दि.२८ ) अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आज दि.२८ बुधवार रोजी सायंकाळी सव्वा ७ वाजता जाधववस्ती परिसरात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या अपघातात संतोष मधुकर कागदे वय ४२ वर्षे (रा. मोरगाव, ता. व जि. बीड) यांचा मृत्यू झाला. ते दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच १२ एच डी १५१४ आणि दुचाकी क्रमांक एम एच १२ ए एल ८५६१ यांच्यात जोरदार धडक झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक अत्यंत भीषण होती. अपघातात संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस प्रशासनास कळविण्यात आले. त्यानंतर लिंबागणेश पोलीस चौकीचे पोह. मन्सूर शेख, पोशि. बाबासाहेब खाडे व पोशि. अब्दुल सय्यद हे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस व रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने या मार्गावर वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
Comments
Post a Comment