“नवनित कांवत साहेब, डोळे उघडा आणि नीट पाहा!”सर्वसामान्यांना हेल्मेट नियमांची सक्ती; मात्र पोलिसांकडूनच नियमांची ऐसी की तैसी!

“नवनित कांवत साहेब, डोळे उघडा आणि नीट पाहा!”
सर्वसामान्यांना हेल्मेट नियमांची सक्ती; मात्र पोलिसांकडूनच नियमांची ऐसी की तैसी!

पोलीस अधीक्षकांना निवेदन:- डॉ. गणेश ढवळे
बीड :- (दि. २४)केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत दि. १९ जानेवारी २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट आदेश स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक मा. नवनित कांवत यांनी जिल्हा प्रशासनाला निर्गमित केले आहेत.

या आदेशाच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८० शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विविध दैनिकांत प्रसिद्ध झाली आहे.

मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या आदेशांनाच केराची टोपली दाखवत पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वतः विना हेल्मेट बिनधास्तपणे दुचाकी चालवत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात सर्रास दिसून येत आहे. यामुळे हेल्मेट सक्तीच्या नियमांचीच नव्हे, तर कायद्याचीही खुलेआम पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात असताना, तेच नियम राबविणाऱ्या यंत्रणेकडूनच त्यांचे उल्लंघन होणे हे लोकशाही मूल्यांना आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेला तडा देणारे आहे. या दुटप्पी भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाचा दुहेरी निकषांचा चेहरा उघड होत आहे.

तरी, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या नियमभंगास आळा घालून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आणि प्रभावीपणे राबवावी, तसेच नियम मोडणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे मा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी