मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले पण कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला नाही :- भाई गौतम आगळे
( प्रतिनिधी ) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले पण बीड जिल्ह्यातील कंत्राटी रोजंदारी सफाई व इतर कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन विविध कामगार कायद्याअंतर्गत सफाई कामगार तसेच इतर कामगारांना देय होत असलेल्या विविध सोयी सवलतीचा अद्याप लाभ मिळाला नाही, अशी खंत रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे व्यक्त केली.
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सर्वत्र अमृत महोत्सव साजरा होत असताना, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सर्व सफाई व इतर कामगारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम येथील जिल्हा प्रशासन व मुख्याधिकारी , नगरपरिषद / नगरपंचायत व त्यांच्या अधिनस्त कंत्राटदार त्यांच्या पातळीवरून सतत करत आहेत असे दिसून येते . मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषण करणार असे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले होते. परंतु डॉ.नीलम पाटील सहाय्यक आयुक्त गट अ , नगरपरिषद प्रशासन विभाग विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद. यांनी मा. जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक बीड यांना उद्देशून पत्र लिहून आपल्या स्तरावरून उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित करण्यात आले. त्यानुसार चंद्रकांत चव्हाण प्र. जिल्हा सहयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी संबंधित अधिकारी, रोजंदारी मजदूर सेना पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदया दीपा मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक २६ / ०९ / २०२३ रोजी दुपारी ०४ वाजता कामगारांच्या मूलभूत अधिकारासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाल्यामुळे नियोजित उपोषण स्थगित केले होते. प्रमुख मागण्या नियोजित बैठकीत तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा. गांधीच्या पुतळ्यासमोर गांधी गार्डन, मंत्रालय, मुंबई समोर कामगार प्रतिनिधी आमरण उपोषण करतील असा इशारा एका निवेदनाद्वारे मा. ना. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
Comments
Post a Comment