लिंबागणेश येथे हरिनामाच्या गजरात भव्य शोभायात्रा
लिंबागणेश येथे हरिनामाच्या गजरात भव्य शोभायात्रा
५१ मृदंग अन् १५० टाळकऱ्यांच्या सहभागाने गाव दुमदुमले; अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
लिंबागणेश : (दि.८)बीड तालुक्यातील बालाघाटावरील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमीत लिंबागणेश येथे आध्यात्मिक वातावरणाला भक्तीचा सुगंध देणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला.सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत वारकरी, महिला, युवक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पांडुरंग हरी’च्या जयघोषाने संपूर्ण लिंबागणेश परिसर दुमदुमून गेला.
शोभायात्रेसाठी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या रथामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री भालचंद्र गजाननाच्या प्रतिमा विराजमान करण्यात आल्या होत्या. ह.भ.प. शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती (बेलेश्वर संस्थान, बेलगाव) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ह.भ.प. महादेव महाराज भारती तसेच ह.भ.प. काका महाराज सामनगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
५१ मृदंगांचा निनाद अन् १५० टाळकऱ्यांचा भक्तिरस
मृदंगमहर्षी केशव महाराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर अध्यात्म वारकरी शिक्षण संस्था, वाघिरा फाटा, लिंबागणेश येथील ५१ मृदंगवादक आणि १५० टाळकरी शोभायात्रेत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या तालावर निनादणाऱ्या अभंगांनी आणि हरिनामाच्या गजराने वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले होते.
शोभायात्रेच्या अग्रभागी भगव्या पताका, त्यामागे टाळ-मृदंगाचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असा मनोहारी भक्तिमय सोहळा पाहायला मिळाला. गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करून भाविकांचे औक्षण केले. त्यामुळे लिंबागणेश नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शोभायात्रेदरम्यान वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार अभंग, गवळणी, हरिपाठ व नामस्मरणाचा अखंड गजर करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या तालावर रंगलेल्या भक्तिरसात आबालवृद्ध भाविक तल्लीन झाले होते.
शोभायात्रेची सांगता सप्ताहस्थळी झाल्यानंतर महंतांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन, आरती व हरिपाठ करण्यात आला. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
सप्ताहादरम्यान दररोज काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
नामस्मरण, भक्ती आणि वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या या भव्य शोभायात्रेमुळे लिंबागणेशचे वातावरण पूर्णतः ‘विठ्ठलमय’ झाले होते.
Comments
Post a Comment