डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने
सरकारच्या दबावाखाली कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी — डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. ४)पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मानवी आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत. डीजेच्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालून त्यावर कठोर निर्बंध आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान विद्यानंद बापट यांना संतोष चव्हाण नामक व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचा आरोप करण्यात आला. ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधक असून, सरकारच्या दबावाखाली करण्यात आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
“सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,”असा इशारा देत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " प्रशासनाच्या दडपशाहीचा धिक्कार असो, संतोष पंडित यांची अटक रद्द करा ' ध्वनीप्रदूषणावर आळा घाला "
निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले. विद्यानंद बापट यांच्यावरील मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संतोष पंडित यांच्या अटकेची चौकशी करून त्यांच्यावरील कारवाईबाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, मुबीन शेख, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच), किष्किंधा पांचाळ (जिल्हाध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), प्राचार्य डॉ. डी. जी. तांदळे (प्रसिद्धी प्रमुख अंधश्रद्धा निर्मूलन समिती बीड), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, बाजीराव ढाकणे अध्यक्ष व्यसन विरोधी प्रमुख बीड)आदी सहभागी झाले.
डीजेच्या कर्णकर्कश ध्वनीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाई निष्पक्षपणे तपासण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Comments
Post a Comment