बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील कृतज्ञतेचा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण – डॉ. जितीन वंजारे
बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील कृतज्ञतेचा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण-डॉ.जितीन वंजारे
बैलांच्या कष्टांना वंदन करणारा, निसर्गाशी नाते सांगणारा आणि गावच्या संस्कृतीला एकत्र आणणारा सण,बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण नसून, शेतकरी आणि त्याच्या शेतीच्या कामात वर्षभर खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्राच्या समृद्ध ग्रामीण संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळ्या प्रथा-परंपरांनुसार हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. काही भागांत याला ‘बेंदूर’ असेही म्हटले जाते, असे प्रतिपादन डॉ. जितीन वंजारे यांनी केले.
वर्षभर ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांसाठी पोळ्याचा दिवस विशेष असतो. या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची मळवट, रंगरंगोटी आणि आकर्षक बाशिंग बांधून, फुगे झिरमाळ्या लावून सजावट केली जाते. आदल्या दिवशी त्यांना तूप व लोणी लावून खांदा मळणी केली जाते वर्षभर ओझं ओढणाऱ्या आणि राबून अन्न धान्यांची पोती घरात ओढून आणल्याने उपकार म्हणून खांदा लोण्याने मळला जातो व बाजरीची भाकर आणि गुळाचा मलिदा यांसारखे पौष्टिक पदार्थ खाऊ घातले जातात. त्यानंतरदुसऱ्या दिवशी पोळ्याला सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी लेझीम, पारंपरिक नृत्य आणि ग्रामीण कलांचे सादरीकरण करून या उत्सवात रंगत आणली जाते.
गावातून मिरवणूक झाल्यानंतर बैलांना घरी आणले जाते. पारंपरिक पद्धतीने “चौर चौर चांग भला, पाऊस आला घरला पळा” असे म्हणत पाणी शिंपडण्याची प्रथा अनेक गावांत आजही जपली जाते. बैल आणि गाईचा प्रतीकात्मक विवाह लावून त्यांची पूजा केली जाते.मिरवणूक करून घरी आल्यावर बैलांची पाय धुतले जातात,पवित्र दिवा व सोन दाखवून आणि पूरन पोळी खाऊ घालून पशुधनाच्या आरोग्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.
बैलपोळ्याच्या दिवशी घरातील तसेच शेतातील देवतांचीही पूजा करण्याची परंपरा आहे. गावातील मुख्य मंदिर, शिवावरील देव, ग्रामदैवत तसेच विविध लोकदैवतांना शेंदूर, चौर आणि नारळ अर्पण केले जातात. हनुमान, विठ्ठल-रखुमाई, पीर, मांगीरबा, म्हसोबा, यताळबा, लक्ष्मीमाता, अंबाबाई, येडाई, वरखेडची आई, तारखा, सालसितबाबा, कान्होबा, नवनाथ, पाचपीर, वाघजाई, आसरा आणि बैलांची दावन अशा विविध श्रद्धास्थानांना गावागावातील प्रथा-परंपरेनुसार पूजले जाते.
पळसाच्या गभोळ्या मुळ्या उकरून काढून त्या भाजण्याची आणि त्यापासून तयार केलेला ‘चौर’ घराला, जनावरांच्या गोठ्याला तसेच कुत्रे, मांजर आणि इतर पाळीव प्राण्यांना बांधण्याची पारंपरिक पद्धतही अनेक ठिकाणी आढळते. या प्रथांमागे पशुधनाचे संरक्षण, आरोग्य आणि घरातील समृद्धी याविषयीची ग्रामीण समाजाची श्रद्धा दडलेली आहे.तसेच गोठ्याच्या पोतरलेल्या भिंतीवर कावू ने आसरा काढल्या जातात बैलांची चित्रे काढली जातात, शेतीत राबणारी माणसं काढली जातात व बैलांच्या शिंगाणा अनुकूचिदार करून हिंगोळ लावला जातो.
बैलपोळा म्हणजे शेतकरी कुटुंबासाठी पुरणपोळी आणि गोडधोडाचाही सण. घरात तुपातील पुरणपोळी, विविध पक्वान्ने केली जातात आणि त्यातील काही भाग प्रेमाने गाई-बैलांना खाऊ घातला जातो. वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचे ऋण मान्य करण्याचा आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात बैलपोळा सामाजिक ऐक्याचेही प्रतीक आहे. जात-धर्माच्या सीमा बाजूला ठेवून गावातील सर्व समाजघटक एकत्र येतात, बैलांची मिरवणूक काढतात, ग्रामदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतात. त्यामुळे बैलपोळा हा केवळ कृषी संस्कृतीचा नव्हे, तर सामाजिक सलोखा आणि सामूहिक आनंदाचा उत्सवही आहे.
पारंपरिक कृषी पद्धती आणि स्थानिक समजुतीनुसार पोळ्याच्या आसपासच्या काळात परतीच्या पावसाला सुरुवात होऊन पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याचा कालखंड सुरू होतो, अशी ग्रामीण भागात धारणा आहे. त्यामुळे पोळ्याचा संबंध शेतीच्या पुढील हंगामाशी आणि कृषीचक्राशीही जोडला जातो. “आला आला पोळा, पाऊस झाला भोळा” अशी ग्रामीण म्हण याच निसर्गचक्राचे प्रतीक मानली जाते.
आजच्या आधुनिक युगात शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी बैलपोळ्याचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, शेती, पशुधन, निसर्ग आणि ग्रामीण जीवन यांच्यातील अतूट नाते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या सणामुळे अधोरेखित होते.
बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याच्या घामाला सलाम, बैलांच्या कष्टांना वंदन आणि निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्यामुळे आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या मातीतल्या या समृद्ध परंपरा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे डॉ. जितीन वंजारे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment