तरनळीतील धोकादायक शाळेचे छत मध्यरात्री कोसळले
"तरनळीतील धोकादायक शाळेचे छत मध्यरात्री कोसळले
१०० अधिकाऱ्यांनी शाळाभेटींचा ‘इव्हेंट’ केला; पण धोकादायक शाळेकडे दुर्लक्ष!
शाळाप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी प्लास्टर कोसळले, चार महिन्यांनी मध्यरात्री छत पूर्णपणे कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली — ‘लेकरं मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?’ : डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.१९) शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी जिल्हा प्रशासनातील सुमारे १०० अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुर्घटनेने पुन्हा समोर आणले आहे. दि.१५ जून रोजी शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी छताचे प्लास्टर कोसळल्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री हलक्या पावसादरम्यान शाळेचे छत पूर्णपणे कोसळले. मध्यरात्री दुर्घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांसह कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “चार महिन्यांपूर्वी शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले होते. त्यानंतरही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. आता छत पूर्णपणे कोसळले; प्रशासन एखाद्या लेकराच्या जीवितहानीची वाट पाहत होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच लेखी निवेदन देऊन धोकादायक शाळेची पाहणी करून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
१८ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रांतर्गत तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत धोकादायक असल्याने ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सानप तसेच मुख्याध्यापक श्रीकांत उजगरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शासकीय अभिलेखांसह शालेय साहित्याचे नुकसान
श्रीकांत उजगरे, मुख्याध्यापक :
“शाळेचा स्लॅब कोसळल्याने त्याच्या मलब्याखाली शासकीय अभिलेखे, हंगामी वसतिगृहाचे अभिलेख, शालेय पोषण आहाराचे साहित्य तसेच झेंड्याचा पाईप दबला गेला. त्यामुळे साहित्य व अभिलेखांचे नुकसान झाले आहे.”
वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष
चांगदेव सानप, ग्रामस्थ :
“शाळेची इमारत धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याचे आम्ही ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी छताचे प्लास्टर कोसळले होते. निदान त्यानंतर तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment