बीड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

बीड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)
दि.१३ : बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन भाजपचे नेते डॉ.योगेश क्षीरसागर व ‘कल्पतरू’च्या सचिव तथा भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. गतवर्षी गणरायाचे आगमन होणार आहे. मागील काही वर्षांपासून ‘कल्पतरू’च्या पुढाकारातून आकर्षक देखावे साकारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन येते. देखाव्यांमध्ये सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच स्थानिक ग्रामीण व शहरी जीवनाशी संबंधित सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणे अपेक्षित आहे. अशा देखाव्यांपैकी उत्कृष्ट मंडळाचा सन्मान करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.


अशी असतील बक्षिसे; उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख बक्षीस दिले जाणार

पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास १ लाख, द्वितीय क्रमांकास ७५ हजार, तृतीय क्रमांकास ५१ हजार व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार आहे. दरम्यान, हा बक्षीस वितरण सोहळा गणेशोत्सव कालावधीत आयोजित केला जाईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.


अशी आहे निवड समिती

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांची निवड करण्यासाठी निरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा.संजय पाटील देवळाणकर, प्रा.सारंग वाघमारे, फामजी पारीख, विद्याभूषण बेदरकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी नोंदणीसाठी श्रीमंत तोंडे ८३२९२५९२९५ व नागेश शेटे ७०५७०२६८७७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी