पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात वृक्षतोड; कार्यकारी अभियंता पवार यांच्यावर कारवाईची मागणी
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात वृक्षतोड; कार्यकारी अभियंता पवार यांच्यावर कारवाईची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; शासकीय कार्यालयातील वृक्षतोडीची सखोल चौकशी करण्याची डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
बीड : (दि. ९)पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यावर भर दिला जात असताना बीड जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच अवैध लाकूडतोड व वृक्षतोडीच्या घटना सुरू असताना शासकीय कार्यालयांच्या आवारातील वृक्षांचीही तोड होत असल्यास ही गंभीर बाब असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
बीड शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील लिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आल्याचे डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या आवारातील झाडे रस्त्यालगतच्या कामात अडथळा निर्माण करत नसतानाही त्यांची तोड का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, वृक्षतोडीचे कारण काय होते आणि तोडलेल्या झाडांबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
तसेच या प्रकरणात नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. पवार यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
‘पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या शासनाच्या यंत्रणेतच जर शासकीय कार्यालयांच्या आवारातील वृक्षांची विनाकारण तोड होत असेल, तर ही बाब गंभीर असून प्रशासनाने याची दखल घ्यावी,’ अशी भूमिका डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment