पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी – नगरसेवक शरद बामदळे
पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट
शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी – नगरसेवक शरद बामदळे
पाटोदा (प्रतिनिधी) पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. डोळ्यांसमोर उभे केलेले पीक हातातून निघून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वर्षभर कष्ट करूनही उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.पेरणीपासून पिकांच्या संगोपनापर्यंत शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. खत-बियाणे, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी खर्च केला. मात्र ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाने साथ सोडल्याने शेतातील उभी पिके वाया गेली असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.शेतात जाऊन वाया गेलेल्या पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळेल, कुटुंबाचा संसार सुरळीत चालेल, अशी अपेक्षा असताना निसर्गाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतात वाया गेलेले पीक आणि हातात रिकामे उत्पन्न, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नगरसेवक शरद बामदळे यांनी केली आहे.“पावसाअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे. वर्षभर शेतात राबूनही हातात काहीच उरले नाही. बळीराजा संकटात असल्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने पंचनामे करून त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी नगरसेवक शरद बामदळे यांनी केली.
Comments
Post a Comment