चेतना सेवा संस्थेचा शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
चेतना सेवा संस्थेचा शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
शिक्षकांच्या कार्याचा गौरव; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
पाटोदा (प्रतिनिधी) चेतना सेवा संस्था, लातूर यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन व शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यात शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
चेतना सेवा संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. सुहास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा. तांबे सर, इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा. आडे सर, डॉ. पल्लवी सूर्यवंशी कॉलेज ऑफ जीएनएमचे प्राचार्य डॉ. चव्हाण सर तसेच बी.एस्सी. नर्सिंगच्या प्राचार्य डॉ. कमल मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पाटोदा, शिरूर, जामखेड व आष्टी या चारही तालुक्यांतील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक वाटचालीतील अनुभव, कार्यक्षेत्रातील अडचणी व मिळविलेले यश याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणाचे महत्त्व, जीवनातील शिस्त, मेहनत आणि भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देशमुख मॅडम व प्रा. राऊत मॅडम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. काळे सर, प्रा. गीते मॅडम, सिद्धू सर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा. तांबे सर यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या शिक्षक सन्मान सोहळ्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा गौरव होण्यासोबतच विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि शैक्षणिक अनुभवांची समृद्ध शिदोरी मिळाली. उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment