पत्रकार गृहनिर्माण सोसायटी की,नगरपालिकेचा दुसराच प्रकल्प?
पत्रकार गृहनिर्माण सोसायटी की नगरपालिकेचा दुसराच प्रकल्प?
युद्धपातळीवर सुरू असलेल्या बांधकामामुळे परळीत चर्चेला उधाण; पत्रकारांची फसवणूक तर होत नाही ना?
परळी वैजनाथ : परळी शहरात सध्या एका बांधकामाची जोरदार चर्चा सुरू असून, हे बांधकाम नेमके पत्रकार गृहनिर्माण सोसायटीसाठी आहे की नगर परिषदेचा दुसराच कोणता प्रकल्प आहे? असा सवाल नागरिकांसह पत्रकारांमध्ये उपस्थित केला जात आहे.
परळी नगर परिषदेकडून सदर ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. कामाचा वेग पाहता, परळी शहरातील प्रत्येक पत्रकाराला दिवाळीपर्यंत एक रो-हाऊस मिळणार असल्याच्या तयारीनेच हे काम सुरू आहे की काय? अशी उपरोधिक चर्चा शहरात रंगली आहे.
मात्र, या बांधकामाचा नेमका उद्देश काय? त्यासाठी मंजूर झालेला प्रकल्प कोणता? जागा कोणत्या योजनेसाठी देण्यात आली आहे? तसेच या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बांधकामाचा पत्रकार गृहनिर्माण सोसायटीशी नेमका काय संबंध आहे? याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पत्रकारांची फसवणूक तर होत नाही ना?
पत्रकार गृहनिर्माण सोसायटीच्या नावावर काही वेगळाच प्रकल्प राबविला जात नाही ना? पत्रकारांना केवळ आश्वासन देऊन त्यांच्या हक्काच्या जागेचा किंवा योजनेचा वापर अन्य कारणासाठी तर केला जात नाही ना? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, या जागेबाबत यापूर्वीही विविध प्रकल्पांच्या चर्चेला उधाण आले होते. एकाच जागेचा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापर करण्याचा 'विश्वविक्रम' नगर परिषदेने केला आहे का? अशीही चर्चा परळी शहरात रंगली असून, हीच जागा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने खुलासा करावा
या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम नेमके कोणत्या योजनेअंतर्गत सुरू आहे, त्याचा मंजूर आराखडा काय आहे, निधी कोणत्या योजनेतून उपलब्ध झाला आहे आणि पत्रकार गृहनिर्माण सोसायटीचा त्याच्याशी काही संबंध आहे का, याबाबत परळी नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट माहिती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, या बांधकामाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून, वस्तुस्थिती काय आहे हे नगर परिषद प्रशासनाच्या अधिकृत खुलाशानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पत्रकार गृहनिर्माण सोसायटीचे स्वप्न प्रत्यक्षात येणार की पुन्हा एकदा आश्वासनांपुरतेच मर्यादित राहणार? याकडे आता परळीतील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment