लिंबागणेश येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता
लिंबागणेश येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता
श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिरसात रंगला सांगता सोहळा
लिंबागणेश : (दि.१५)बीड तालुक्यातील बालाघाटावरील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता मंगळवारी (दि.१५) श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सांगता सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सजवलेल्या रथातून महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज ( मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती, महंत महादेव महाराज भारती ( बेलेश्वर संस्थान बेलगाव) यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. महिलांनी घरासमोर सडासमार्जन करून सुवासिनींनी महाराजांचे औक्षण केले. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
“तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती; नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे!” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. संतसाहित्याच्या माध्यमातून भगवंताच्या सहवासाचे महत्त्व विशद करत त्यांनी नामस्मरण, सदाचार, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश दिला.
सप्ताहभर नामस्मरणासह समाजप्रबोधन
दि. ८ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयोजित सप्ताहात ह.भ.प. शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती (मठाधिपती, बेलेश्वर संस्थान, बेलगाव), ह.भ.प. धर्मराजदादा सामनगावकर (गुरूपीठ, सामनगाव), ह.भ.प. लक्ष्मण मेंगडे महाराज (मठाधिपती, बंकटस्वामी संस्थान, निनगूर), ह.भ.प. शिवाजी महाराज बावसकर (बुलढाणा), ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (धारूर), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे (कर्जत), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (संत चोखोबाराय संस्थान, बुलढाणा) आदी नामवंत कीर्तनकारांनी विविध विषयांवर कीर्तनातून समाजप्रबोधन केले.
सप्ताहभर हरिजागर, दुपारची प्रवचनसेवा, ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दररोज पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला.
सांगता सोहळ्यास ह.भ.प. महादेव भारती महाराज (बेलेश्वर संस्थान), मृदंग महर्षी केशव महाराज जगदाळे, व्यासपीठ चालक ह.भ.प. हरिदास महाराज खुळे (वैजाळा), मृदंगाचार्य यांच्यासह समस्त गावकरी, भजनी मंडळी, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सप्ताहकाळात लिंबागणेश परिसरात हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
संतवाणीने दिला आध्यात्मिक उन्नतीचा संदेश
काल्याच्या कीर्तनातून महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला देत भगवंताच्या सहवासाचे महत्त्व सांगितले. नामस्मरण, सदाचार, संस्कार आणि समाजातील बंधुभाव जपण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले.
सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी
अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांनी उपस्थिती लावली. हरिजागर, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून सप्ताहभर धार्मिक वातावरणासोबतच समाजप्रबोधनही करण्यात आले.
Comments
Post a Comment