शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी हंटर मैदानात
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी हंटर मैदानात!
राज्यांतील १९ जिल्ह्यांसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा;
जिरायतीला ₹२५ हजार, बागायतीला ₹५० हजार तर बहुवार्षिक पिकांना ₹७५ हजार हेक्टरी मदत द्या.
शेतकरी हंटर सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन
बीड, (प्रतिनिधी) :
पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, खरीप हंगामातील पिके संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. पावसाअभावी बाधित १९ जिल्ह्यांसह मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वाढीव हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकरी हंटर सामाजिक संघटना, महा, राज्य आक्रमकपणे पुढे सरसावली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहित (ऊर्फ) बाळासाहेब धुरंधरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले.
पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे अनेक भागांतील खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी यावर मोठा खर्च केला; मात्र पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हेक्टरी मदतीचा स्पष्ट प्रस्ताव!
शेतकरी हंटर सामाजिक संघटनेने निवेदनातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे स्पष्ट प्रमाण शासनासमोर मांडले आहे.
▪ जिरायती पिके — ₹२५,००० प्रति हेक्टर
▪ बागायत/सिंचनाखालील पिके — ₹५०,००० प्रति हेक्टर
▪ बहुवार्षिक पिके — ₹७५,००० प्रति हेक्टर
ही मदत विद्यमान नैसर्गिक आपत्ती मदतीपेक्षा वाढीव स्वरूपात देऊन पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट DBT पद्धतीने जमा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
“पंचनामे कागदावर नकोत; शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करा!”
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे आर्थिक मदत मंजूर करावी. पीकविमा योजनेचा लाभ विनाविलंब मिळवून द्यावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शेतीपंपांच्या वीजबिलाबाबत तात्पुरता दिलासा, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरज असलेल्या भागात चारा छावण्या आणि टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
केवळ पाऊस मोजू नका; शेतातील पिकांची अवस्था पाहा!
दुष्काळ जाहीर करताना केवळ पर्जन्यमानाचा आकडा न पाहता पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पाणीसाठा, पेरणी क्षेत्र, पावसातील खंड आणि उत्पादनातील संभाव्य घट यांचा सर्वंकष विचार करावा, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
निवेदन देताना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी शेतकरी हंटर सामाजिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष प्रवीणजी पालीमकर, पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवींद्र शिंनगारे सर, बीड तालुका अध्यक्ष अशोक (दादा) ढोले पाटील, तालुका उपाध्यक्ष तावरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“शेतकऱ्यांना आश्वासन नव्हे, आता प्रत्यक्ष मदत हवी!”
“शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक संकटामुळे त्याचे आर्थिक गणित कोलमडले असताना शासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी वाढीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी हंटर सामाजिक संघटना निर्भिड, रोखठोक व निःस्वार्थ भूमिका घेऊन सातत्याने आवाज उठवत राहील,” असे संस्थापक अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment