नाळवंडीतील पीडित कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भेट
नाळवंडीतील पीडित कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भेट
मंत्री भरतशेठ गोगावले यांचा फोनद्वारे संवाद; आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन
पाटोदा (प्रतिनिधी) : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पाटोदा तालुक्याच्या वतीने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यात आला. तसेच या प्रकरणात पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे संपर्कमंत्री भरतशेठ गोगावले यांनी फोनद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. सदर घटना अत्यंत गंभीर असून सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल तसेच घटनेतील आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार देत, “न्याय मिळेपर्यंत शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” असा विश्वास दिला. या प्रकरणातील दोषींवर कोणतीही हयगय न करता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्येही तीव्र संताप असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. तपास यंत्रणांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख स्वप्नील भैय्या गलधर, तालुकाप्रमुख राहुल चौरे, शिवसेना दलित आघाडी जिल्हाप्रमुख सचिन मेघडंबर, किसान सेना जिल्हाप्रमुख अशोक पवार, विधानसभा प्रमुख नारायण सानप, सतीश जाधव, गणेश जायभाय, मोतीराम बडे, मंगेश बेंद्रे, अनिकेत जावळे, सचिन सावसे, वैभव वासकर, अशोक घोषित, निलेश येवले, महादेव येवले, सरपंच अण्णासाहेब येवले, अशोक चव्हाण, गोरख येवले, पांडू तात्या मस्के, अंगदशेठ भोंडवे, महेंद्र अटकरे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment