लिंबागणेश येथे कुणबी प्रमाणपत्र विशेष शिबिर


लिंबागणेश येथे कुणबी प्रमाणपत्र विशेष शिबिर


 तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे मार्गदर्शन; ८ गावांचे महसुली रेकॉर्ड जळाल्याने कुणबी नोंदी शोधण्याचे आव्हान
लिंबागणेश : (दि.११)मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजातील नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र सुलभतेने व विनाविलंब मिळावे, यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांच्या स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर घेण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास लिंबागणेश महसूल मंडळाधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी शेख गफुर, ग्रामपंचायत अधिकारी दत्ता नागरे, सरपंच बालासाहेब जाधव,प्रमोद कोळपकर ( तलाठी बोरखेड), विपुल बनकर ( तलाठी मुळुकवाडी, बेलखंडी पाटोदा),नारायण दराडे ( तलाठी अंजनवती),लिंबागणेश महसुल मंडळातील सर्व ग्राममहसुल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील व महसूल सेवक उपस्थित होते.

आवश्यक कागदपत्रांबाबत तहसीलदारांचे मार्गदर्शन

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये वंशावळ, महसुली पुरावे, शालेय दाखले, जन्म-मृत्यू नोंदी, रहिवासी पुरावा, उपलब्ध जुन्या महसुली नोंदी, हैदराबाद गॅझेटमधील नोंदी, विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र व शपथपत्र आदी कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी ही विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत. शिबिराच्या कालावधीत जुन्या महसुली नोंदी व इतर पुरावे शोधणे, नागरिकांकडून प्राप्त अर्जांची छाननी करणे तसेच पात्र अर्जदारांना नियमानुसार प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

 ८ गावांचे रेकॉर्ड जळाल्याने नोंदी शोधण्याचे मोठे आव्हान

दरम्यान, लिंबागणेश महसूल मंडळाच्या अंतर्गत पूर्वी असलेल्या मुळुकवाडी, मसेवाडी, सोमनाथवाडी, बेलगाव, पिंपरनई, पोखरी (घाट), फुकेवाडी यासह आठ गावांतील जुने महसुली रेकॉर्ड तहसील कार्यालयात जळाल्याने नमुना क्रमांक ३३ व ३४ मधील नोंदी उपलब्ध नसल्याचा मुद्दा यावेळी ऐरणीवर आला.

रेकॉर्डच उपलब्ध नसल्यास या गावांतील नागरिकांच्या कुणबी नोंदी शोधणार कशा, असा सवाल मराठासेवक डॉ. गणेश ढवळे, महारूद्र वाणी व मुळुकवाडीचे सरपंच रामकिसन कदम यांनी उपस्थित केला. संबंधित गावांतील जुन्या नोंदींचा पर्यायी स्रोत शोधून नागरिकांना पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे केली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी