कोरडा दुष्काळ जाहीर करा! सरकारची मानसिकता गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसारखी; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा!  
 सरकारची मानसिकता गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसारखी; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन  

पिक विम्याचे निकष व ट्रिगर पूर्ववत करा :- डॉ. गणेश ढवळे 
बीड : (दि. ७ सप्टेंबर) पावसाअभावी बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याची शक्यता असून, पिकांच्या उत्पादकतेत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे. त्यातच केंद्र व राज्य शासनाने पिक विमा योजनेतील निकष व ‘ट्रिगर’मध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात तातडीने 'कोरडा दुष्काळ 'जाहीर करावा आणि पिक विम्याचे निकष व ट्रिगर पूर्ववत करावेत, या मागणीसाठी सोमवारी (दि. ७) बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स येथे गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार आणि कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन देण्यात आले.

‘दुष्काळाकडे बघू नका, दुष्काळाबाबत ऐकू नका आणि दुष्काळ जाहीर करू नका’ अशीच सरकारची भूमिका असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीचा प्रतिकात्मक वापर करून शासनाच्या दुष्काळविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला. " शेतकऱ्यांचा एकच नारा,कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना न्याय द्या" पिक विम्याचे निकष पुर्ववत करा " शेतकरी वाचवा देश वाचवा " आदी घोषणाबाजी करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील ५५ महसूल मंडळांमध्ये पावसाअभावी बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

पिक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना फटका

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी पावसाअभावी पेरणीला विलंब, पावसाचा खंड, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीनंतर पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विविध निकषांच्या आधारे नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद होती. मात्र पिक विमा योजनेतील ‘ट्रिगर’मध्ये बदल झाल्याने २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाईची तरतूद प्रभावीपणे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विमा योजनेचे निकष व ट्रिगर पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली.

बीड जिल्ह्यात सुमारे ४ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर पिक विमा काढण्यात आला असून, २१५७ कोटी ७२ लाख ५ हजार ४९७ रुपयांचे विमाकवच घेण्यात आले आहे. एकूण क्षेत्राच्या सुमारे ५० टक्के क्षेत्राचा पिक विमा काढण्यात आला असून, विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना बदललेल्या निकषांचा फटका बसू नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तलाव, विहिरी आटल्या; पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाअभावी बीड जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक साठवण तलाव प्रकल्प जोत्याखाली गेल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. अनेक तलाव व विहिरींनी तळ गाठल्याने शेतीसोबतच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत द्यावी आणि पिक विम्याचे निकष व ट्रिगर पूर्ववत करावेत, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, मुबीन शेख, बाळासाहेब मोरे (पाटील, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष), किश्किंधा पांचाळ (जिल्हाध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज बीड), सिता दहे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), भिमराव कुटे ( मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा) , कॉम्रेड.डी. जी. तांदळे (अध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा बीड), ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे,बप्पासाहेब पवार, आण्णासाहेब मतकर ( जिल्हाध्यक्ष रासप बीड), शेषेराव वीर आदी सहभागी झाले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी