बी दि चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ आत्मलिंग शेटे यांना प्रदान
बी दि चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ आत्मलिंग शेटे यांना प्रदान
परळी समाचार व दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक म्हणून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
शिर्डी, प्रतिनिधी : पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे परळी समाचार व दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक आत्मलिंग शेटे यांना बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सौंदर्य कला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुनील उत्तमराव मोहोड, सूबेदार मेजर (निवृत्त), भारतीय सेना, मा. श्री. अरुण भंडारे (निवृत्त), कार्याध्यक्ष त्रिदल सैनिक संघ नाशिक व सैनिक फेडरेशन नाशिक, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. निलेशजी घोडेचोर, मॅनेजर पंजाब नॅशनल बँक, अभिनेत्री व मॉडेल मा. निवेदिता पगार, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मा. शुभांगी थोरात, मा. डॉ. निलेश गायकवाड तसेच मा. अॅड. योगेश दवंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते आत्मलिंग शेटे यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याने हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्यस्तरीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आत्मलिंग शेटे यांचे पत्रकारिता, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बी दि चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष व सर्व विश्वस्तांनी केले होते. समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरावर सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा बी दि चेंज फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
Comments
Post a Comment